परंडा प्रतिनिधी (तानाजी घोडके ) विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते जीवाचे रान करत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र मतदारात निवडणुकीबद्दल फारसा उत्साह दिसून येत नाही. ग्रामीण भागात शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने नेते आणि कार्यकर्ते थेट बांधावर जाऊन प्रचार करत आहेत. परंडा विधानसभा क्षेत्रात परंडा, भूम आणि वाशी या तीन तालुक्यातील सुमारे 242 गावांचा समावेश आहे. वाशी तालुका कळंब मतदारसंघात समाविष्ट होता. मतदारसंघ पुनर्रचना करताना वाशी तालुका परंडा मतदारसंघाला जोडण्यात आला. त्यामुळे परंडा मतदारसंघाची व्याप्ती वाढली असून थोड्या कालावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. परंडा भूम विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिनिधित्व केले आहे. 1980 साली चंदनसिंह काका सद्दीवाल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळविला होता. मात्र 1985 साली त्यांना पुन्हा संधी मिळाली नाही. 1990 साली महारूद्र मोटे यांनी काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवली. महारूद्र मोटे यांना 1985 व 1990 साली मतदारांनी विधानसभेत पाठवले. 1995 साली शिवसेनेचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांनी तिरंगी लढतीत महारूद्र मोटे यांचा पराभव केला. शिवसेनेचा भगवा झेंडा पहिल्यांदा परंडा विधानसभा मतदारसंघात फडकला. त्यानंतर 1999 साली मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्या. त्या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील पुन्हा एकदा विजयी झाले. 2004 साली राहुल मोटे यांनी सरळ लढतीत ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव केला. त्यानंतर 2009 आणि 2014 मधे राहुल मोटे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राबल्य या मतदारसंघात वाढत गेले. 2019 साली तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांचा 35 हजार मतांनी पराभव करत विजयाची मालिका खंडीत केली. मागच्या पाच वर्षात राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन गट निर्माण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. तसेच शिवसेनेतही गटतट पडल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मागच्या पाच वर्षांत हजारो कोटी रुपयांचा विकास निधी आणून विकासकामे केल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. पालकमंत्री तानाजी सावंत प्रत्येक सभेत कामांचा उल्लेख करत आहेत. याउलट विकासकामे झाली नसल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. आरोप प्रत्यारोप व दावे प्रतिदाव्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे. परंडा भूम विधानसभा मतदारसंघात आजही अनेक प्रश्न आहेत. या संपूर्ण क्षेत्रात रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. दळणवळणाच्या सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने उद्योगधंदे इकडे येण्यास तयार होत नाहीत. रोजगाराच्या संधी मिळत नसल्याने येथील युवक पुणे आणि मुंबई या महानगरात जाऊन पोट भरण्याचा प्रयत्न करत आहेत. सिंचन क्षेत्र वाढले असले तरी अनेक भागात पाणी उपलब्ध होत नाही. शिक्षणाचा प्रश्न सुद्धा गंभीर आहे. या भागात उच्च शिक्षण देणारी शिक्षण संस्था उभारावी असे कुठल्याही लोकप्रतिनिधीला कधीही वाटलेले नाही. त्यामुळे लोकांना निवडणूक व उमेदवार याविषयी फारसे स्वारस्य नसल्याचे दिसून येते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तानाजी सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्यात लढत होत आहे. जुना गडी नवे राज्य अशा प्रकारची ही लढत होत आहे. तेच तेच खेळाडू परत परत निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने लोकांत या निवडणुकीविषयी उदासीनता दिसून येत आहे. प्रश्न सुटत नसल्यामुळे लोकांत नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचे मोठे आव्हान उमेदवार व कार्यकर्ते यांच्यासमोर आहे. गटातटाचे राजकारण, बदललेली राजकीय समीकरणे, गेल्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय घडामोडी यांचा परिणामी येत्या मतदानात दिसून येईल. परंडा विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढत होत असून निकालाबाबत राजकीय वर्तुळात अनेक शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.