परंडा तालुक्याच्या हद्दीतील रस्त्याचे काम अधिकाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे रखडले आहे
परंडा, दि. ६- परंडा-वारदवाडी रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. १५ दिवसांपूर्वी शहरातील प्रीतम मंगल कार्यालयापासून एका बाजूनी सुरु करण्यात आले. रस्ता खोदून निघालेली तीच माती रस्त्यावर पसरवून त्यावर बारीक खडी टाकून दबाई करून काँक्रिट करण्यात आले आहे. मात्र, १५ दिवसांत दोनशे मीटर रस्त्यावर क्राँक्रिटचा पहिला थर करण्यात आला. रस्ता खोदून ठेवल्याने व्यापाऱ्यांसह रस्त्यावरून करणाऱ्या ये – जा वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता करण्यासाठी ऐन दिवाळीत रस्ता खोदून ठेवल्याने व्यापाऱ्यांसह वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांच्या रेलचेलमुळे दुकानातील साहित्यावर धूळ बसत आहे. त्यामुळे व्यापारी वैतागले आहेत. तर दुचाकी चालकांच्या डोळ्यात धूळ जात असल्याने घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. धुळे येथील एस. बी. देशमुख कन्स्ट्रक्शन कंपनीकडे रस्त्याचे काम करण्याची मोठी यंत्रणा असल्याने या कंपनीला काम मिळाले आहे. मात्र, पंधरा दिवसांत फक्त दोनशे मीटर काँक्रिट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. संथगतीने काम सुरु असल्याने व्यापारी वाहनधारकांतून नाराजी पसरली आहे. हे काम असेच सुरू राहिल्यास मुदतीत काम पूर्ण होईल का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. परंडा तालुक्यातील रोसा गाव ते वारदवाडी फाट्यापर्यंत तालुक्याची हद्द आहे. त्यापुढे बार्शी व करमाळा तालुक्याची हद्द आहे. या रस्त्याचे काम बार्शी व करमाळा तालुक्यात पूर्ण झाले आहे. परंडा तालुक्याच्या हद्दीतील रस्त्याचे काम अधिकाऱ्यांच्या तांत्रिक चुकीमुळे रखडले आहे. रोसा गाव ते वारदवाडी फाट्यापर्यंत रस्त्याच्या कामाला निधी कमी मंजूर झाला आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.