प्रतिनिधी (२४) बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदे याला पोलीस चौकशीसाठी घेऊन जात असताना त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी जखमी झाले. अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भातील सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.
ठाणे पोलिसांनी काय म्हटलं?
पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पोलिसांच्या चकमकीत अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, “जी घटना घडली, त्या घटनेची प्राथमिक अशी आहे की, बदलापूर पोलीस ठाण्यात बदलापूर येथील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा गुन्हा अक्षय शिंदेवर दाखल होता. तसेच अक्षय शिंदेवर आणखी एक गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होता. अक्षय शिंदे याच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अक्षय शिंदेच्या पत्नीने दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस करत होते. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाची ट्रान्सफर ऑर्डर घेऊन कायदेशीर रित्या सदर आरोपीचा ताबा तळोजा कारागृहामधून घेतला होता. त्यानंतर पोलीस अक्षय शिंदेला घेऊन जात असताना सदर आरोपीने पोलिसाची बंदूक हिसकावून घेऊन पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अक्षय शिंदेचं एन्काउंटर खरं की खोटं? बदलापुरात नेमकं काय घडलं? प्रत्येकाचे वेगवेगळे दावे
“यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नवीन कायद्यानुसार, २६२, १३२, १०९, १२१ भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच जो आरोपी आहे तो मयत झालेला आहे. त्यासंदर्भात देखील अकस्मात मृत्यू प्रकरण दाखल करण्यात आलेलं आहे. या दोन्ही प्रकरणाचा तपास ठाणे पोलीस आयुक्तालय करत आहे”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली आहे.
बदलापूर प्रकरण नेमकं काय?
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमूरड्या मुलींवर अक्षय शिंदेने अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीला शाळा प्रशासन आणि नंतर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. शाळा प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. तसेच पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करताना दिरंगाई केल्याचा आरोपही झाला होता. त्यानंतर बदलापूरमध्ये संताप व्यक्त केला गेला होता. २० ऑगस्ट रोजी बदलापूर मधील नागरिकांनी रेल्वे रोको आंदोलन करत जवळपास ९ तास मध्य रेल्वे वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली होती. दरम्यान, अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु होता.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.