परंडा ( श्रीराम विद्वत) जागतिकीकरणाच्या या काळात ब्राम्हण समाजात मुला-मुलींच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुलांची पस्तीशी उलटून गेली तरी लग्न होत नसल्याने पालक चिंताक्रांत झाले असून या समस्येवर उपाय काढण्यासाठी व्यापक चर्चा होणे आवश्यक आहे असे मत ब्राम्हण समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
ब्राम्हण समाजाच्या मुला -मुलींच्या लग्नाचा विषय गंभीर झाला आहे. वय उलटून गेले तरी लग्न होत नसल्याने मुलांचे आई -वडील काळजीत पडले असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः मुलांच्या लग्नाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. खेड्यात राहणारे, शेती करणारे, व्यावसायिक मुलांना कोणीही विचारत नसल्याचे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून सांगण्यात येत आहे. मुलींना महानगरातील पुणे आणि मुंबई या भागातील मोठे पॅकेज असलेली मुले हवी असल्यामुळे खेड्यात राहणारी, कमी पगारात काम करणारी मुले अविवाहित राहतील की काय अशी भीती समाजातील जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.
संगणक क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे ब्राम्हण समाजात लग्नाचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे लक्षात येते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या संख्येने ब्राम्हण समाजातील मुले-मुली नोकरीला लागली आहेत. त्यांना मिळणारा पैसा पाहून बाकीच्या लोकांचे डोळे दिपले आहेत. पगाराचे आकडे ऐकून मंडळी हैराण होत आहेत. यातून मग आपल्या मुलीला याच क्षेत्रात काम करणारा मुलगा पाहिजे असा अट्टाहास धरला जात आहे. यातून बाकी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांना मुली मिळणे दुरापास्त झाले आहे.
निमशहरी भागात राहणाऱ्या ,कमी पगारावर काम करणाऱ्या मुलांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या मुलांचे विवाहाचे वय कधीच उलटून गेले आहे. त्यामुळे या मुलांचे पालक चिंताक्रांत झाले असल्याचे दिसून येत आहे. आपली मुले अविवाहित राहतील काय अशी रास्त शंका त्यांना वाटू लागली आहे.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्राम्हण समाजातील सर्व घटकांना व्यापक चिंतन करावे लागणार आहे. पहिल्यांदा तर आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. समोरासमोर आल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाचे उत्तर सापडणे अशक्य आहे. यासाठी विवाह मेळावे अतिशय उपयुक्त ठरतात. या मेळाव्यात पालक आणि मुलांनी सहभागी होणे गरजेचे आहे. यातुन आपल्या ओळखी होतील. लग्नाच्या शक्यता वाढतील. आपण घरी बसून चौकशी करत राहीलो तर लग्न होण्याची शक्यता फार कमी आहे. हे समजून घेणे आवश्यक आहे. लग्न जमायचे असेल तर फिरले पाहिजे. शक्यतो आपल्या ओळखीच्या लोकांतच लग्न जमवणे योग्य राहील. कारण अलीकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. महिना दोन महिन्यात घटस्फोट होत असल्याची अनेक उदाहरणे दिसून येतात. याचा विचार करणे आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे.
पूर्वी मुलांची बाजू वरचढ समजली जात होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. मुली उच्चशिक्षित आणि कमावत्या झालेल्या आहेत. शिक्षण, नोकरी आणि नोकरीत मनासारखे पॅकेज मिळेपर्यंत लग्नाचे वय उलटून चालले आहे. मुलींचे पालक मुलींचे सर्व हट्ट पुरवत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी मुलींच्या लग्नाचा प्रश्न सर्वस्वी मुलींवर सोपवल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुलींना आज फार मोठ्या प्रमाणावर निर्णय स्वातंत्र्य मिळाले आहे. त्याचा परिणाम म्हणून आज ब्राम्हण समाजातील मुले अविवाहित राहण्यात झाला आहे.
या परिस्थितीचा विचार करून समाजाच्या सर्व घटकांना यावर उपाय काढणे ही काळाची गरज आहे. याचा आपण सर्वांनी विचार करावा आणि योग्य ती पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.