दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम राज्य सल्लागार मंडळाची बैठक संपन्न
मुंबई, दि. १३:- दिव्यांग बांधव समाजाचा महत्वाचा घटक असून त्यांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अनुसार गठीत राज्य सल्लागार मंडळाची बैठक आज मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, बंदर विकास मंत्री दादा भुसे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त मुख्य सचिव विकास खारगे, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की दिव्यांग बांधवांना सार्वजनिक ठिकाणी वावर सुकर होण्याकरिता कार्यालये, शाळा, रुग्णालये ही दिव्यांग सुगम तयार करावीत. यासाठी सर्व विभागांना पत्र पाठवून सूचीत करण्यात यावे. दिव्यांगासाठी शासन अनेक योजना राबवत आहेत. विविध विभागांच्या समन्वयातून या योजना त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घ्यावा, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.यावेळी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी अधिनियमाबाबत सादरीकरण केले.
Discover more from माझं गांव माझं शहर
Subscribe to get the latest posts sent to your email.
Yes