धाराशिव दि. 13 सप्टेंबर (माझं गांव माझं शहर ) : राज्य सरकारची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता परंडा शहरातील कोटला मैदान येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महिला सशक्तीकरण अभियानाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे, राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले व कैलास पाटील यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात जिल्ह़यातील 10 यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. विविध विभागाअंतर्गत 9 महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांचे वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतंर्गत 5 महिलांना प्रातिनिधीक स्वरुपात लाभाचे वाटप, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 15 महिलांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध विभागांचे योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारुन त्यामध्ये महिलांविषयक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबीराचे आयोजन करुन महिलांची आरोग्य तपासणी व सकस आहार यासह स्वच्छताविषयक माहिती देण्यात येणार आहे. कामगार विभागाच्या वतीने महिला कामगारांना भांडी वाटप करण्यात येणार आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्याकडून महिला बचत गटांची नोंदणी करण्यात येवून स्टॉलच्या माध्‍यमातून महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने महिलांना उद्योग उभारणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाला जिल्हयातील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.



Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading