परंडा ( प्रतिनिधी ) परंडा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने तहसील पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ सुरू असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. परंडा शहर व तालुक्यातील नागरिक हे रेशन कार्ड शिधापत्रिकेसाठी सीएससी सेंटर व महा-ई-सेवा केंद्र येथून ऑनलाईन अर्ज करत असतात. पण नागरिक ऑनलाईन अर्ज करूनही त्यांना दोन-तीन महिने रेशन कार्ड मिळण्यास लागत आहेत. विविध शासकीय कामांसाठी , शैक्षणिक कामांसाठी रेशन कार्डची गरज नागरिकांना असते. गोरगरीब , सर्वसामान्य नागरिकांना रेशनधान्य मिळविण्यासाठी रेशनकार्डची गरज असते. महा-ई-सेवा केंद्र अथवा सीएससी सेंटर मधून रेशन कार्डसाठी अर्ज करूनही वेळेवर रेशनकार्ड मिळत नसल्याने नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना , निराधार महिलांना व घरकूल साठी रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत सीएससी सेंटर चालकांना विचारणा केली असता शासनाचे सर्वर बंद असल्याने रेशनकार्ड मिळण्यासाठी वेळ लागत आहे असे सांगितले जाते. ऑनलाइन रेशन कार्डला मंजुरी देण्याचे काम तहसील कार्यालय पुरवठा विभागातून केले जाते. उलसूलट चर्चा नागरिकांत सुरू आहे. रेशन कार्ड वेळेवर मिळत नसल्याने सर्व सेवा केंद्रांवर अथवा महा-ई-सेवा केंद्रांवर येऊन नागरिक हे विचारणा करत आहेत. यामुळे काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवत असल्याच्या घटना घडत आहेत. परंडा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने वेळेवर रेशन कार्ड वितरित करण्याची मागणी रेशन कार्ड धारकातून केली जात आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.