परंडा,ता. ७( प्रतिनिधी ) परंडा येथील रहिवाशी असलेले व सध्या शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील डॉ गजानन राशीनकर व डॉ प्रज्ञा पाटील यांनी स्तनाच्या कर्करोगावरील हाइपर्थरमिया या उपचारासाठी लागणाऱ्या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात यश प्राप्त केले आहे.नॅनोमॅग्नेटाइटच्या अतिसूक्ष्म रेणूवर विविध रासायनिक क्रिया करून त्यावर एन-हेटेरोसायक्लिक कार्बिनचे आवरण चढवून त्याचे सोने या धातू सोबत प्रक्रिया करून या चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करण्यात आली आहे. या अभिनव संशोधनासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय युके व भारतीय पेटंट प्रदान करण्यात आले आहे.
सदर संशोधनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. डी. सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.डॉ. राशीनकर व डॉ. प्रज्ञा यांनी स्तनाच्या कर्करोगावरील केलेले संशोधन वैज्ञानिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून प्रेरणादायी आहे. या संशोधनास भारतीय आणि युके पेटंट मिळाल्यामुळे शिवाजी विद्यापीठाचा वैज्ञानिक ठसा जागतिक स्तरावर उमटला आहे – कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के
हे चुंबकीय नॅनो कण कर्करोगावरील हाइपर्थरमिया या उपचार पद्धतींमध्ये अतिशय प्रभावी पद्धतीने वापरले जाऊ शकतात.चुंबकीय नॅनो कणांच्या विशिष्ट संरचनेमुळे ते स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींसी जोडले जातात. जेव्हा अश्या जोडल्या गेलेल्या नॅनो कणांवर चुंबकीय बल टाकले जाते तेव्हा सतत बदलत जाणाऱ्या चुंबकीय लहरीच्या प्रभावामुळे मुळे हे कण उष्णता उत्सर्जित करतात. या प्रक्रिये दरम्यान साधारणपणे 40 ते 48 डिग्री सेंटीग्रेड इतके तापमान निर्माण होते. यामुळे कर्करोगांच्या पेशींची अंतर्गत रचना ढासळते आणि त्या नष्ट होतात. विशेष बाब म्हणजे हे नॅनोकण कर्करोगाच्या गाठीला रक्तपुरवठा करणाऱ्या विविध रक्तवाहिन्यांची देखील वाढ थांबवण्यास उपयुक्त ठरतात. ह्या प्रक्रिये दरम्यान सर्वसाधारण पेशींना मोठ्या प्रमाणावर अपाय न करता केवळ स्तनाच्या कर्करोगांच्या पेशी नष्ट करण्याकरिता या नॅनो कणांचा प्रभावी उपयोग होतो.हे संशोधन एन-हेटेरोसायक्लिक कार्बिन आणि मूलभूत धातूनपासून नवनवीन नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधन क्षेत्रास दिशा देणारे ठरणार आहे अशी माहिती डॉ राशीनकर यांनी दिली.या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. पद्मा दांडगे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. विश्वजीत खोत आणि डॉ. अर्पिता तिवारी यांनी मोलाचे योगदान दिले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.