MYVILLAGEMYCITY : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्व. मा.आ. ज्ञानेश्वर पाटील यांच्या दोन्ही पुत्रांकडून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मा. आ. राहुल मोटे व त्यांच्या पत्नी वैशाली मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीचा अद्याप तिढा सुटला नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे महाविकास आघाडीची बिघाडी झाल्याचे दिसून येते. सोमवारी तब्बल १६ जणांनी उमेदवारी भूम तहसील कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून मोठे शक्ती प्रदर्शन भूम शहरात करण्यात आले. शिवसेना (ठाकरे) गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्व. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील हे शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांसोबत तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आले. त्यावेळी राहुल मोटे आणि रणजीत पाटील यांची समोरासमोर भेट झाली असता एकमेकांनी गळाभेट घेतली. मात्र दोघांनीही अर्ज दाखल केले असल्याने लोकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. ३ नोव्हेंबरला कोण माघार घेणार, कोण उमेदवार राहणार, याकडे नागरीकांच्या नजरा लागल्या आहेत. त्यातच मनोज जरांगे | पाटील यांनी मराठा समाजातील बहुतांशी लोकांना उमेदवारी अर्ज दाखल करा, असे सांगितले असल्याने बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये वाशीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत चेडे, भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बन्सी डोके, रासप कडून आरोग्य दूत डॉ. राहुल घुले, रासपचे कार्यकर्ते नानासाहेब मदने, विश्वजीत ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण रणबागुल, मारुती कारकर, महादेव लोखंडे, वैशाली मोटे, असिफ जमादार, लक्ष्मीकांत आटूळे, निळकंठ भोरे, शहाजान शेख, गुरुदास कांबळे आदींनी अर्ज दाखल केले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.