सोलापूर (प्रतिनिधी) बदलत्या काळामध्ये डिजिटल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. या माध्यमाला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम आमची संघटना करणार आहे. आम्ही पत्रकार व त्याच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगातील दोनशे देशात पोहचवायचे आहे, असे उदगार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी काढले.
व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा महाराष्ट्र राज्याच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा बार्शी जिल्हा सोलापूर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ, शिक्षण तज्ञ अनिल बनसोडे, प्रख्यात साहित्यिक रामचंद्र इकारे सर, कर सल्लागार व व्हॉईस ऑफ मीडियाचे संचालक सुरेश शेळके, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, वृक्षसंवर्धन समिती व कर्मवीर ढोल – ताशा पथकाचे अध्यक्ष उमेश काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलग आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पत्रकार समाजाच्या कल्याणासाठी आवाज उठवण्याचे काम करतो,परंतु त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणारी संघटना म्हणून पुढे आलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाचे अभिनंदन करताना शिक्षण तज्ञ अनिल बनसोडे बोलत होते.
मोबाइलच्या माध्यमातून पत्रकारिता करीत असताना विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम पत्रकाराने केले पाहिजे, समाजाने चांगले काम करणाऱ्या व्यक्तीच्या कायम पाठीशी राहिले पाहिजे असे मत साहित्यिक शितोळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त डिजिटल मीडिया पत्रकारांनी व्हॉईस ऑफ मीडियाचे सभासद व्हावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी सर्वांना केले.
पत्रकारांसाठी चोवीस तास काम करणारी ही संघटना असून पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी व संघटनेच्या माध्यमातून सोडविले जातील असे प्रतिपादन कार्यालयीन राज्य सचिव गणेश शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले.
समाजामध्ये अनुयायी तयार करणारे तर अनेक आहेत परंतु नेतृत्व तयार करणारी ही संघटना आहे, आपल्याकडे असणारी रत्नपारखी दृष्टी हे अत्यंत महत्त्वाची आहे, कामावरून निवड करणारी ही संघटना आहे, असे गौरोद्गार प्रसिध्द साहित्यिक रामचंद्र ईकारे यांनी काढले.
प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हर्षद लोहार, सचिव इर्शाद शेख, सहसचिव प्रसाद कानेटकर, कोषाध्यक्ष प्रविण पावले, उपाध्यक्ष मनोज घायाळ, अश्विनी पुरी,कार्याध्यक्ष अशोक घावटे, बाळासाहेब भालेराव, कार्यवाहक संतोष शेलार, राज्य संघटक दीपक ढवळे यांनी स्वीकारली.
डिजिटल मीडिया विंगच्या पत्रकारांना अधिकृत मान्यता, शासनाच्या विविध सोयी व सवलती मिळाव्यात म्हणून काम करण्यात येणार असल्याचे नुकतेच नियुक्त झालेले प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी सांगितले. लवकरच डिजिटल मीडिया विंगची उर्वरित राज्य कार्यकारिणी लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुकीतून निवडली जाणार आहे असे ही ते म्हणाले.
सूत्रसंचालन अपर्णा दळवी हिने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कर्मवीर ढोल-ताशा ध्वज पथक, व्हॉईस ऑफ मीडिया, बार्शी व तालुक्याचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.